Thursday, January 26, 2017

मला भावलेले लोथल !

(आधी अगदी थोडक्यात  माहिती देते आणि ही माहिती एक इतिहासाची अभ्यासक म्हणून देतेय.
अधिक तपशीलवार माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहेच)
सिंधु संस्कृती :  इ. स. पूर्व 3200 ते इ. स. पूर्व 1600 या कालखंडामधे सिंधु- सरस्वती नद्यांच्या खोऱ्यामधे ही संस्कृती विकसित झाली. 1920-21 मधे या प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. दयाराम सहानी, डॉ. देवदत्त भांडारकर, राखालदास बॅनर्जी, जॉन मार्शल, सर मॉर्टिमर व्हीलर अशा विविध संशोधकांनी या संस्कृतीची जगाला ओळख करून दिली. मोहेंजोदारो, हराप्पा, मेहेर गढ, कोट दिजी, राखी गढ, कालीबंगन, चन्दुदारो, देसलपूर, धोलावीरा, सुरकोटडा, कुंतासी, रंगपूर, रोजडी,लोथल, अशी जवळजवळ 1500 साईट्स सापडल्या आहेत.


नियोजनबद्ध नगर बांधणी, चौरस आकाराची शहरे, सार्वजनिक स्नानगृहे, बंदिस्त बांधलेली सांडपाण्याची व्यवस्था, वर्गानुरुप गावरचना, काटकोनात छेदणारे रस्ते, पक्क्या विटांचा वापर, 4 : 2 : 1 अशा प्रमाणातल्याच विटांचा वापर, बालेकिल्ला, कोठारं, अग्निकुंडे, बांधीव विहिरी, बांधीव गोदी( डॉकयार्ड), मुद्रा,  गोमेद, अकिका दगडाच्या मण्यांचे अलंकार, स्टिएटाईट या मऊ दगडाचे अतिसुक्ष्म मणी आणि त्यांचे अलंकार, मातीची पक्की भांडी, परदेशांशी व्यापार, जलमार्गाने व्यापार, लेखन कला, वजने, शेती, शेतीसिंचन,  खतांचा वापर, तांब्याचा वापर आणि व्यापार, शंखांचे दागिने, कापड, मातीची पक्की खेळणी, सप्तमातृका, ब्रान्झची नर्तकी ही या संस्कृतीची काही वैशिष्ट्ये.
भूकंप, नद्यांचे पूर, बदललेली नैसर्गीक परिस्थिती, आक्रमणं यापैकी काही कारणांनी ही संस्कृती लयाला गेली. या बद्दल नक्की पुरावे नाहीत. पण एक अत्यंत प्रगत संस्कृती इथे नांदत होती.)


(डिसक्लेमर  : हे मला जसं भावलं लोथल तसं लिहिलय. हा काही संशोधनपर लेख नाही. संशोधनपर लेख लिहिण्यासाठी वेगळा फोरम वापरेन )

इयत्ता सहावीतली पहिली आठवण आहे लोथलची! शाळेत सर्वसामान्यपणे इतिहास हा नावडीचा विषय असतो मुलांचा. पण माझ्याबाबतीत मात्र उलटच झालं. आणि याचं कारण होतं ते आमच्या इतिहासाच्या कुलकर्णीबाई. त्या इतिहास आणि पीटी असं दोन्ही घेत. आणि पीटी, त्यासोबत येणारे खेळ हे माझे फार प्रिय. माझ्या मोठ्या बहिणी भारी हुशार, अभ्यासू आणि शांत. मी मात्र दांडगोबा, अभ्यासापेक्षा खेळाकडे लक्ष असणारी आणि चुळबुळी. त्यामुळेच शाळेत खोखो, लंगडी आणि अगदी कब्बडीमधेही मी नेहमी मी टीम मधे असे. त्यामुळे पीटीच्या कुलकर्णी बाईंची मी लाडकी होते आणि त्या माझ्या लाडक्या बाई होत्या. स्वाभाविकच त्या शिकवत असलेला इतिहास हा विषयही आवडू लागला. त्यांची इतिहास शिकवायची पद्धतही खूप छान होती. आधी गोष्टी सांगून धड्यात काय आहे हे सांगत आणि मग धडा शिकवत. याच वर्षी प्राचीन इतिहास शिकायला होता. अन त्यातच मोहेंजोदारो, हराप्पा, लोथल ही नावं ओळखीची झाली. सिंधुसंस्कृतीशी माझी नाळ जुळली ती तेव्हापासूनच.

पुढे अकरावीत माझे लाडके सर आणि मार्गदर्शक गुरु डॉ. राजा दीक्षित भेटले. त्यांच्यामुळे तर इतिहासाकडे बघण्याचा अजूनच नवा दृष्टिकोन मला मिळाला. अकरावीतच लोथलची जास्त माहिती मिळाली. अभ्यासक्रमातून आणि त्याहीपेक्षा दीक्षितसरांच्या लेक्चर्समधून. तेव्हापासून या सिंधुसंस्कृतीचे गारुड मनावर बिंबले होते. हराप्पा, मोहेंजोदारो, रुपड, कालीबंगन, चन्हुदारो, लोथल या ठिकाणचे उत्खनन, तिथल्या साईट्स बघायची एक अनामिक इच्छा मनात कोरली गेली.

पण पुढे इतिहास आणि पुरातत्वशास्त्र यातला फरक लक्षात आला आणि इतिहासाची ओढ- एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाची भूल  जास्त पडली, अन मग मी इतिहासाकडे वळले. मग पुढे डॉ. अरविंद देशपांडे सरांसारखे अतिशय हुषार, विचारवंत, हाडाचे शिक्षक, गुरु मार्गदर्शक म्हणून लाभले अन इतिहासातच मी गुंगून गेले.

पण मनामधे खोलवर सिंधू संस्कृतीतली स्नानगृहं, आखीव रेखीव नगररचना, सांडपाण्याची भुयारी व्यवस्था, सार्वजनिक विहिरी, वैशिष्ट्यपूर्ण वीट, धर्मगुरुची मूर्ती, सप्तमातृका, मण्यांचे अलंकार, लोथलची प्रसिद्ध गोदी, विविध मुद्रा- नाणी, वजनांचे प्रकार, खेळणी, अशा कितीतरी गोष्टी कोरल्या गेल्या. त्या प्रत्यक्ष बघायला हव्यात ही एक इच्छा मनात आत जिवंत राहिली.

मधे अनेक वर्ष गेली. जवळचे दायमाबाद बघून यावे; एखादे तरी उत्खनन बघावे असे कितीदा तरी ठरवले पण प्रत्यक्ष  जाणं मात्र झालच नाही..अशीच बरीच वर्ष गेली...

अन मग अचानक नवऱ्याचे एक प्रोजेक्ट अहमदाबादला सुरू झाले. अन मग मी 4-5 दिवस तिथे जायचे ठरवले, तशी ही मनात खोलवर असलेली इच्छा सुळ्ळकन वर आली. लोथल, अहमदाबादपासून केवळ दोन तासाच्या अंतरावर होतं. मग बसून सगळा प्लान केला. अहमदाबाद मधे काय काय बघायचं. ते मी एकटी फिरून बघू शकणार होते. पण लोथल ला मात्र नवऱ्याला घेऊन जायचं, त्यालाही हा अनुभव मिळावा असं वाटलं. त्यानुसार सुटीच्या दिवशी आम्ही लोथलला निघालो. तिथे खूप ऊन असेल, साईटवर फिरायचं म्हणजे ऊन फार व्हायच्या आधीच पोहोचावं म्हणून पहाटेच निघालो.

साडे आठपर्यंत लोथलला पोहोचलो तर खरं. पण तिथे कोणीच दिसेना. डावीकडे एक गेट तिथे कुलूप, समोर एक गेट, तिथे वर म्युझियमची पाटी पण तिथेही कुलूप. आता काय करायचं असा विचार करे पर्यंत तिथले रखवालदार आले.
म्युझियम दहाला उघडेल इतक्यात नाही असं सांगितलं त्यांनी. मी विचारलं "और साईट, साईट कब देख सकेंगे हम? "

साईट ह्या शब्दाने जादू केली. रखवालदारांना समजलं की मला लोथलची माहिती दिसतेय. त्यांनी लगेच हसत डावीकडचे कुलूप उघडले. "हा आईये, साईट आप देख सकते हो अभी. "
मग मी त्यांच्याशी थोडी दोस्ती केली, मी इतिहासाची प्राध्यापक आहे आणि महाराष्ट्रातून आलेय म्हटल्यावर त्याने फारच प्रेमाने सगळी साईट फिरवून दाखवली.

तर साईटवर पाऊल टाकलं, समोरच लोथल, सिंधु संस्कृतीची माहिती देणारा फलक दिसला. आणि मला अचानक भरून आलं. अखेर इतक्या दिवसांची, नव्हे वर्षांची इच्छा आज पुरी होतेय.



दहा बारा पावसं पुढे गेले अन माझं लक्ष उजवी कडे गेलं...
तिथे विहीर होती. गोलाकारात विटांनी बांधलेली...  तिला कॅमेरात पकडलं. अन पुढे  झालो.




उजवीकडे नजर गेली आणि ओ माय गॉड... इतकी वर्ष फक्त चित्रांमधे बघितलेली लोथलची सुप्रसिद्ध गोदी!


मी लांबून बघतच राहिले, एक क्षण माझा माझ्यावर विश्वास बसेना. साडेचार हजार वर्षापूर्वीचा इतिहास माझ्यासमोर उभा होता.  मी रखवालदारांना लिचारलं, "यही डॉकयार्ड है ना?" मला दिसत होतं पण तरीही विचारल्या शिवाय रहावेना. अन मी मंत्रमुग्ध झाल्यासारखी ओढले गेले.

किती मोठी, किती प्रचंड मोठी गोदी होती ती. पक्या विटांनी बांधलेली. माझ्या डोळ्यात मावेना. बघा  तो लाल गोल दिसतोय? साधारण मध्यात एक माणूस उभा होता . चित्रावर क्लिक केलात की चित्र मोठ होईल मग निट  दिसेल.

मी पुढे पुढे जात गेले. नजरेसमोरचा तो प्रचंड मोठा डॉकयार्ड कोरडा ठक्क होता,

पण मनानेच माझ्या डोळ्यांना  साडेचार हजार वर्षांपूर्वीची गजबजलेली गोदी दिसत होती. 215* 37 मीटर लांबरुंद आणि 8 मीटर खोल. समोरून भोगावो नदीतून येणारी मोठी जहाजं, माल उतरवणारे लोकं, मागे जास्तीचे पाणी समुद्रात नेऊन सोडणारी नाली/ कालवा, या नालीतून सगळे पाणी समुद्रात सोडून दिल्यावर कोरडी होणारी गोदी, मग त्या कोरड्या गोदीमधे बोटींची होणारी दुरुस्ती....


शब्दात नाहीच मांडता येत तो सगळा अनुभव....


एकीकडे माझी कॉमेंट्री सुरू होती. इतकावेळ रखवालदार  काय काय सांगत होता, पण आता तोही माझं बोलणं एेकू लागला. सोबत नवऱ्याचा बंगाली मित्र होता त्यामुळे हिंदीत माझी बडबड चाललेली. नदी कुठे, समुद्र कुठे, समुद्रातून नदीमार्गे बोटी कशा येत, व्यापार कोणा कोणाशी चालत असे, काय वस्तु विकल्या जात, का काय सांगत होते मी. ..


अन मग एकदम स्तब्ध झाले...

माझ्या समोर पसरलेली प्रचंड मोठी गोदी अन मी, बस बाकी सगळं हरवलच. हलकेच नवऱ्याने हलवलं मला. चल पुढे जाऊत म्हटलं, तशी भानावर आले. समोर आता 215 * 65 मीटर लांबरुद पण फक्त दोन मीटर उंच विटांची भिंत दिसत होती, माझे डोळे पाणावले...



मग उलटं वळून मागे आलो. तस समोर टेकाड दिसू लागलं, त्यावरच्या भिंती... शप्पथ! जुन्या शहरात आले होते मी.


समोर गोदाम होतं, थोडं उंचावर. खाली मोठा चौथरा, त्यावर इमारतीचा ढाचा! आता अर्धवट पडलेल्या भिंती, कधीकाळी कितीतरी मौल्यवान वस्तुंचा कडेकोट बंदोबस्त करणाऱ्या...



आम्ही अजून थोडं पुढे आलो. आता उजवीकडे नगर वसलेलं.


अगदी काटेकोर ओळीत बांधलेली घरं, स्नानगृह.
शेजारून विटांनी बांधून बंदिस्त केलेली सांडपाण्याची व्यवस्था; प्रत्येक चौकात गोलाकारात वळवलेली.





तिथेच एक वीट सुटीच वर होती, तिलाही कॅमेरात घेतलं.



थोडं पुढे गेलो तर तिथे कुंभाराची गोल आकारात बांधलेली भट्टी दिसली.


तिला वळसा घालून पुढे झालो अन लोखंडी जाळी खाली बंदिस्त केलेले दागिने तयार करायच्या कारखान्यातली भट्टी दिसली. इथे तयार केले जाणारे दागिने अतिशय कौशल्यपूर्ण होते. आजही या दागिन्यांच्या निर्मितीचे गुढ उकलले नाहीये. पुढे सविस्तर सांगते त्या बद्दल.


डावीकडे खालच्या बाजूला अजूनही बरेच उत्खनन व्हायचे आहे पण पुरातत्वखात्याकडे असलेल्या अपुऱ्या निधीमुळे सगळे तसेच वाट बघत राहिलेय... कितीतरी मोठा इतिहास अजून मातीखाली दबलाय, बाहेर येण्याची वाट बघत. अगदी जड अंतकरणाने उलटे फिरलो. पुन्हा वाटेतल्या सगळ्या इमारती भिंती न्याहाळत परत आलो.


पण पुन्हा पावलं गोदीकडे वळली. नवऱ्याला म्हटले थांब आलेच. मला एकटीला तिला भेटायचे होते. आता जरा अजूनच जवळ आले, थोडी खाली वाकले आणि त्या भितींवरून हात फिरवला.


अनामिक हूरहूर दाटून आली. खाली बघितलं, तळाला भेगा पडल्या होत्या. गेली दोन वर्ष तिथे पाऊसच पडला नव्हता, पाणी पार आटून गेलं होतं...तो तळच अजून काही सांगू पहात होता पण माझीच ग्रहणशक्ती अपुरी पडली. पुन्हा डोळे भरून आले. नवऱ्याने आवाज दिला तशी उभी राहिले, पाय निघत नव्हता, पुन्हा एकदा डोळ्यांमधूनच गोदीला कवेत घेतलं अन परतले.

बाहेर पडताना रखवालदारांना धन्यवाद दिले, तर तो म्हणाला, "बहेनजी, आते तो बहोत सारे लोग, लेकिन यहाँकी इटोंको सुनते बहोत कम लोग!" एक कटक सलाम केला त्याने.  मी नमस्कार करून पुढे झाले. नवऱ्याने नंतर सांगितले की रखवालदार पैसे घ्याला तयारच नव्हता; "ये तो मेरी ड्युटी है, मेरा अच्छा नसीब है के मै यहाँ काम करता हू " म्हणत होता. पण त्याच्या नातीच्या शिक्षणासाठी ठेव म्हटल्यावर घेतले त्याने. त्या स्थानाचे महत्व त्याला पुरेपूर कळले आहे हे पाहून खूप छान वाटलं.

हे ते रखवालदार, तिथल्या दुसऱ्या विहिरी सोबत



बाहेर आलो तर म्युझियमचे गेट उघडलेले. मग आत गेलो पण तिकिट देणारी व्यक्ती अजून यायची होती. तिथे बाहेर बसायची छान सोय होती, छान बाग तयार केलेली. मग तिथे झाडांवरचे पक्षी निरखण्यात आणि त्यांचे फोटो काढत मी पुन्हा आजमधे आले.

थोड्याच वेळात म्युझियम उघडलं आणि आम्ही आतला खजिना बघायला गेलो. इथे मात्र कॅमेरा मना होता. आत शिरल्या शिरल्या ते  स्टिएटाईटचे प्रसिद्ध मणी दिसले, दिसले म्हणण्यापेक्षा भल्यामोठ्या भिंगामधून बघावे लागले. हो, अतिशय बारीक म्हणजे मोहरीच्या दाण्याहूनही लहान असे मणी, त्यांना बारीक भोक पाडलेले. भिंगातून बघताना त्यांचा सुबकपणा अजूनच जाणवला. पुढे गोमेदच्या मण्यांचे दागिने होते. हे गोमेद हा अतिशय कणखर दगड. त्याच्यापासून लांबट चपटे मणी बनविण्याचा कारखाना साईटवर बघितला होता. हा दगड भाजला की त्याचा रंग गडद लाल होतो. त्यावर नंतर कोरून त्यावर काही रासायनीक प्रक्रिया करत आणि हा कोरलेला भाग पांढरा बनत असे. हे काम त्या दागिन्यांच्या कारखान्याच्या भट्टीत होत असे.

पुढे अनेक भांडी, मोठमोठ्या सुरया, भांडी, हत्यारं, साधनं होती. मध्यात लोथलचा नकाशा होता.

उजवीकडे एक आर्टिफिशियल बरियल ( मृतांना पुरण्याची जागा) तयार केली होती. लोथलमधे सापडलेले दोन मूळ सांगाडे काचेच्या पेटीत बंदिस्त ठेवलेले. माझं मन पुन्हा भरून आलं... हे आपले पहिले वंशज असतील! काय आणि कशा प्रकारचं आयुष्य यांनी अनुभवलं असेल... साडेचार हजार वर्षांची पोकळी अशी सट्टकन संपली, माझी त्यांची नाळ जुळली. न कळत मनात कृतज्ञता भरून आली. या लोकांनी सुरु केलेली, समृद्ध केलेली संस्कृती मला आजपर्यंत घेऊन आलीय.

पुढे गेले तर, व्यापारासाठी उपयुक्त अशी वजनं आणि तराजू समोरच्या काचेमागे दिसला. वजन करता यावं, वस्तुची निश्चित किंमत ठरवता यावी यासाठीची ही वजनं. तुम्हाला डोळ्यासमोर किलो, 500 ग्रॅम अशी वजनं आली न? पण छे, ही वजनं अतिशय छोटी होती. सगळ्यात मोठं वजन आपल्या सापशिडीतल्या चौकोनी फाशापेक्षा थोडं उजवं. अन सगळ्यात छोटं वजन तर मुगाच्या डाळीच्या दाण्या एवढं. आश्चर्य वाटलं? इतक्या लहान वजनाची वस्तूही इथे विकली जायची. हो, सुरुवातीला जे अगदी छोटे मणी बघितले न भिंगातून, त्यांचा व्यापार होत असे, शिवाय गोमेदचे मणी. हे अतिशय महाग असत. त्यामुळे अगदी छोटी वजनंही वापरावी लागत. ह्या मण्यांना तेव्हा पश्चिम आशियात खूप मागणी असे.

थोडं पुढे आले अन चेहऱ्यावर हसू आले. यस हीच ती सिंधु संस्कृतीतली लहान मुलांसाठी तयार केलेली खेळणी. बैलगाडी, चिमणी, पोपट, शिटी, चाकावर फिरणारा पक्षी, किती किती वैविध्य! जो समाज मुलांच्या खेळण्यासाठी इतकी मेहनत घेतो तो नक्कीच किती तरी पुढारलेला असेल नाही?

आता निघायची वेळ झालेली. पुढे अजून एक महत्वाचा टप्पा होता ( त्याबद्दल पुन्हा केव्हातरी)
पाय तर निघत नव्हते. मग बाहेर काऊंटरला पुस्तकांची चौकशी केली. म्हटलं फोटो काढता आले नव्हते तर इथले काही पुस्तक, काही ब्रॉशर मिळाले तर घ्यावे. पण तिथल्या कर्मचाऱ्याने अतिशय वाईट वाटून सांगितले, " बहेनजी किताबे खतम हो गयी है. और नयी एडिशन निकालने के लिये हमारे विभाग के पास पैसे नहिं है"
भारतातील इतिहासाबद्दलची अनास्था पुन्हा एकदा जाणवली. नवीन संशोेधन, उत्खनन इतकेच नव्हे तर पुस्तकं ज्यातून निधी जमा होऊ शकतो, तीही छापायला निधी नाही ... :(
असो
पुढच्या वाटेवर मी गप्पच होते. डोळ्यासमोरून ती गोदी, त्या भिंती, विहिर, भट्टी, गोदाम हलतच नव्हते. लोथल, मनात भरून राहिलं होतं. इतक्या वर्षांची इच्छा अचानक पूर्ण झाली. मनात ही सगळी चित्र आता जन्मभर जागती राहतील ___/\___



No comments:

Post a Comment